Abhijit Dipke : पोलीस कायद्यापेक्षा मोठे झालेत का? हा सवाल विचारण्यामागचं कारण हे आहे…की पोलीस बॉयज नावाची संघटना अभिजीत दीपकेंचे हातपाय सलामात राहणार नाही, अशी थेट ऑनकॅमेरा धमकी देते आणि त्यांच्यावर काहीच कायदेशीर कारवाई होत नाही, मग पोलिसांनी गुंडगिरी केलेली चालतेय का? असा थेट सवाल लोक आता विचारू लागलेत, हा सगळा वाद काय आणि हा वाद नेमका दीपकेंच्या हातापायापर्यंत कसा पोहोचला?
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके आणि छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस यांच्यात झालेल्या वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर येथील दीपके यांच्या निवासस्थानी ड्युटीवर असलेल्या एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकासोबत त्यांचा एक तीव्र शाब्दिक वाद झाला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला.
अभिजीत दीपके आणि पोलिसांमध्ये नेमका वाद कशावरून? ( Abhijit Dipke )
या वादानंतर पोलिसांच्या हक्कासाठी लढणारी आणि पोलिसांच्या नातेवाईकांची संघटना असलेली ‘महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना’ अत्यंत आक्रमक झाली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या नेतृत्वाखाली दीपके यांच्याविरोधात राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून, त्यांचे पोलीस संरक्षण तात्काळ काढून घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या वादाला आता राजकीय स्वरूप प्राप्त झाले असून, एका बाजूला पोलीस बॉईज संघटना आणि दुसऱ्या बाजूला दीपके यांच्या समर्थनार्थ उभी राहिलेली रिपब्लिकन सेना आमनेसामने आल्याने छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण महाराष्ट्रात हा चर्चेचा मुख्य विषय बनला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सीजेपीचे प्रमुख अभिजीत दीपके ( Abhijit Dipke ) हे गेल्या काही काळापासून विविध सामाजिक आणि विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवरून प्रशासनाविरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या बजाजनगर येथील निवासस्थानी मोजक्याच प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीला गुजरात आणि इतर राज्यांतील काही सदस्यांना बोलावण्यात आले नव्हते, ज्यामुळे नाराज झालेल्या दोन सदस्यांनी थेट दीपके यांच्या घराबाहेर येऊन घोषणाबाजी करत छोटेखानी आंदोलन केले. या अंतर्गत वादामुळे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलत अभिजीत दीपके यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता. यामध्ये एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी सुरक्षेची जबाबदारी सांभाळत होते.
हेही वाचा : TET पेपरफुटीचे सोलापूर कनेक्शन उघड; खासगी प्रशिक्षण केंद्र चालकाला
पोलीस कायद्यापेक्षा मोठे आहेत का?
वाद नेमका कसा सुरू झाला, याबद्दल दोन अत्यंत भिन्न प्रवाह पाहायला मिळत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, दीपके यांना भेटण्यासाठी त्यांचे अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक घराबाहेर जमा झाले होते. सुरक्षेवर तैनात असलेल्या पोलीस उपनिरीक्षक सुरेश सांगळे यांनी या लोकांना थांबवून त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. दीपके यांचा असा आरोप आहे की, साध्या वेशात आलेल्या या पोलीस अधिकाऱ्याने भेटायला येणाऱ्या सामान्य नागरिकांशी अत्यंत उद्धट आणि अरेरावीची भाषा वापरली.
आपल्या दारात आलेल्या लोकांचा अपमान होत असल्याचे पाहून अभिजीत दीपके ( Abhijit Dipke ) प्रचंड संतप्त झाले आणि त्यांनी थेट घरातून बाहेर येत संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला सर्वांसमोर खडे बोल सुनावले. व्हिडिओमध्ये दीपके त्या अधिकाऱ्याला विचारताना दिसतात की, तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटचे आहात? तुमचे नाव काय? आणि माझ्या घरात कोण येणार आणि कोण जाणार हे ठरवणारे तुम्ही कोण? या संतापजनक संवादानंतर दीपके यांनी “गेट आऊट, मला तुम्ही माझ्या घरात नको आहात, बाहेर जा” असे म्हणत त्या अधिकाऱ्याला घराबाहेर जाण्यास सांगितले.
व्हायरल व्हिडिओनंतर पोलीस बॉईज संघटना आक्रमक ( Abhijit Dipke )
हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना अधिकृतपणे मैदानात उतरली आणि त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले आणि प्रतिनिधी शंकर दरांगे यांनी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि जिल्हाधिकाऱ्यांना एक विशेष निवेदन सोपवले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पोलीस अधिकारी हे २४ तास स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता लोकप्रतिनिधी आणि नेत्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. शासकीय कर्तव्यावर असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला, जो वयाने दीपके यांच्या वडिलांच्या वयाचा आहे, अशा प्रकारे सर्वांसमोर अपमानित करणे, त्यांना घरातून हाकलून लावणे हा संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाचा घोर अपमान आहे. पोलीस बॉईज संघटनेने थेट इशारा दिला आहे की, अभिजीत दीपके यांनी जर संबंधित पोलीस अधिकाऱ्याची पाय धरून जाहीर माफी मागितली नाही, तर त्यांना महाराष्ट्रात कुठेही फिरू दिले जाणार नाही आणि त्यांच्या घरासमोर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल.
हा वाद केवळ शाब्दिक राहिला नसून, आता थेट ‘हातपाय राहतील की नाही’ अशा गंभीर धमक्यांपर्यंत पोहोचला आहे. पोलीस बॉईज संघटनेच्या आक्रमक भूमिकेनंतर रिपब्लिकन सेनेने अभिजीत दीपके यांच्या बाजूने खंबीर उडी घेतली आहे. रिपब्लिकन सेनेच्या नेत्यांनी पोलीस बॉईज संघटनेला प्रतिआव्हान देताना म्हटले आहे की, जर लोकशाही मार्गाने काम करणाऱ्या नेत्यांना आणि नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न केला, तर ते सहन केले जाणार नाही. “जे लोक हात उपसण्याची किंवा फिरू न देण्याची भाषा करत आहेत, त्यांनी लक्षात ठेवावे की त्यांचे पायही जागेवर राहणार नाहीत,” अशी थेट चेतावणी रिपब्लिकन सेनेने दिल्याने या दोन संघटनांमधील वाद अत्यंत टोकाला गेला आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील कायदा व सुव्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला असून राजकीय वर्तुळातूनही यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
हेही वाचा : शारीरिक संबंधांपूर्वी होणारा नवरा औषध देणार असल्याचं आईला सांगितलं;
पोलीस प्रशासनाची या वादावर काय भूमिका? ( Maharashtra Police Boys Association )
या संपूर्ण प्रकरणाने समाजात दोन अत्यंत महत्त्वाचे आणि तितकेच संवेदनशील प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यावर सध्या सोशल मीडिया आणि कायदेतज्ज्ञांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. पहिला प्रश्न म्हणजे, “पोलिसांचे नातेवाईक किंवा पोलीस संघटना म्हणून कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन गुंडगिरी करण्याचा अधिकार कोणाला आहे का?” आणि दुसरा प्रश्न, “पोलीस यंत्रणा किंवा त्यांचे पाठीराखे स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजू लागले आहेत का?” सर्वसामान्य जनतेमधून अशी प्रतिक्रिया येत आहे की, पोलीस हे जनतेचे रक्षक आहेत, भक्षक किंवा हुकूमशहा नाहीत. लोकशाहीमध्ये कोणत्याही नागरिकाला त्याच्या खाजगी जागेत कोणाला भेटायचे आणि कोणाला नाही, हा संपूर्ण अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे. पोलिसांचे काम सुरक्षा देणे आहे, खाजगी आयुष्यात किंवा राजकीय भेटीगाठींमध्ये हस्तक्षेप करून व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करणे नाही, असा सूर दीपके यांच्या समर्थकांनी लावला आहे.
दुसऱ्या बाजूला, पोलिसांच्या बाजूने उभे राहिलेल्या नागरिकांचे आणि संघटनेचे म्हणणे आहे की, जर शासनाने एखाद्या व्यक्तीला अधिकृत सुरक्षा दिली असेल, तर त्या सुरक्षेचे काही नियम असतात. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसाला संशयित व्यक्तींची चौकशी करण्याचा, त्यांची नावे नोंदवण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार आहे, कारण उद्या जर दीपके यांच्या सुरक्षेला काही धोका निर्माण झाला, तर सर्वात आधी पोलिसांनाच जबाबदार धरले जाईल. अशा परिस्थितीत ऑन-ड्युटी अधिकाऱ्याला अपमानास्पद शब्द वापरून घरातून हाकलणे हे शासकीय कामात अडथळा आणण्यासारखे आहे. यामुळे पोलिसांचे नैतिक मनोधैर्य खचू शकते, म्हणूनच पोलीस बॉईज संघटनेने दीपके यांचे पोलीस संरक्षण तात्काळ काढून घेण्याची मागणी लावून धरली आहे आणि कारवाई न झाल्यास राज्यभरात ‘चक्का जाम’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
हा वाद आता केवळ एका पोलीस उपनिरीक्षक आणि दीपकेंपुरता मर्यादित राहिलेला नाही, सोशल मीडियावर या विषयावरून नेटकऱ्यांमध्ये दोन तट पडले आहेत. एका बाजूचे लोक पोलिसांच्या जुन्या भ्रष्टाचाराच्या आणि सर्वसामान्यांना मिळणाऱ्या उद्धट वागणुकीच्या कथा शेअर करून दीपके यांच्या भूमिकेचे समर्थन करत आहेत, तर दुसरा वर्ग हा एका वर्दीतील अधिकाऱ्याचा लोकशाही मार्गाने मान राखला गेलाच पाहिजे, या मतावर ठाम आहे. गृहविभागाने आणि पोलीस प्रशासनाने या प्रकरणात कमालीचा संयम बाळगला असून, दोन्ही बाजूंच्या तक्रारींची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.









