आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. मुंबई येथे आज काँग्रेसकडून एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. याच शिबिरात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी काँग्रेस मुंबई महानगरपालिकेत स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे हा महाविकास आघाडीतील इतर राजकीय पक्षांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी स्वतंत्र पालिका निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेतल्याची रमेश चेन्नीथाला यांनी सांगितले. मुंबईच्या पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी किंवा इतर कोणासोबत न जाण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
मुंबई काँग्रेसच्या वतीने ही निवडणूक स्वबळावर लढली पाहिजे, हे आम्ही मांडलं. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासोबत आमची युती कायम असणार आहे, त्यांच्याशीही आम्ही बोलणार आहोत, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकलाच पाहिजे!
लढू आणि जिंकू!#Lakshya2026 #Mumbai #BMCElections pic.twitter.com/BvsMp3kJ6F— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) November 15, 2025
मनसेला महाविकास आघाडीसोबत घेण्यास काँग्रेसचा कडाडून विरोध
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र काँग्रेसने मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यास विरोध दर्शविल्याचे याआधी दिसून आले होते. त्यामुळे निवडणुकीत मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच आता आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.
“हा निवडणूक आयोगाचा विजय असून, भाजपचा नाही“; चेन्नीथला
बिहारच्या निवडणुकीवर बोलताना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले, “हा निवडणूक आयोगाचा विजय असून, भाजपचा नाही. काँग्रेसमध्ये प्रत्येक जातीचे लोक आहेत. त्यांच्या पक्षात फक्त एका जातीचे लोक आहेत, ही आमची परंपरा आहे. मोदी आणि शाह यांनी निवडणूक आयोगाचा दुरुपयोग केला असून, याबाबत लोकांमध्ये जाऊन जागृती करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका करत असतात, असेही त्यांनी सांगितलं.












