Devendra Fadnavis On Congress | मुंबईत (Mumbai) भाजप (BJP) पक्षाने वरळी परिसरात ‘महिला जन आक्रोश मोर्चा’ आयोजित करण्यात आला होता. हा मोर्चा आयोजित करून भाजपने एक व्यापक राजकीय आणि सामाजिक संदेश दिला आहे. या मोर्चात भाजपचे नेते, मोठ्या संख्येने महिला आणि पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर हा मोर्चा वरळीच्या जॅम्बोरी मैदानापासून सुरू झाला आणि वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब येथे संपला. तर या मोर्चादरम्यान संपूर्ण मार्गावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. तर भाजप पक्षाच्या नेत्यांच्या मते, महिलांशी संबंधित मुद्द्यांवरून जनतेचा संताप व्यक्त करणे आणि महिला सक्षमीकरणासाठी आवाज उठवणे हा या मोर्चाचा उद्देश होता.
हेही वाचा – शरद पवारांना रूग्णालयात केलं दाखल, सुप्रिया सुळेंनी प्रकृतीबाबत दिली मोठी माहिती
या मोर्चात महिलांचा सहभाग आणि राजकीय प्रतिनिधित्व वाढवण्याची मागणी प्रामुख्याने मांडण्यात आली. मोर्चा संपल्यानंतर आयोजित ‘जन आक्रोश महिला संमेलना’ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी संबोधित केले. त्यांनी महिलांना संबोधित करताना महिला आरक्षण विधेयकावरून विरोधी पक्षांवर आणि विशेषतः काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मोर्चातील मोठी गर्दी हे दर्शवत आहे की महिला आपल्या हक्कांसाठीच्या लढ्यात कधीच मागे हटणार नाहीत.
देवेंद्र फडणीवसांची काँग्रेसवर जोरदार टीका, नेमकं काय म्हणाले?
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेस पक्षाने महिला आरक्षणाच्या मागणीकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केले आणि संसदेत ती मागणी पुढे नेली नाही. माजी पंतप्रधानांचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले की, त्यांच्या कार्यकाळात हे विधेयक मांडण्यात आले होते, परंतु पुरेसे बहुमत नसल्यामुळे ते मंजूर होऊ शकले नाही. तसेच काँग्रेस पक्षाचा महिलांना सक्षम करण्याचा कधीच हेतू नव्हता. तर पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली महिला आरक्षण विधेयक पुढे रेटण्यात आले, परंतु विरोधी पक्षाने त्याला विरोध करून आपला खरा विचार उघड केला आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.
राहुल गांधी म्हणाले होते की हिंदुत्वाची शक्ती नष्ट केली पाहिजे. हिंदुत्वात शक्ती म्हणजे स्त्री, आदिशक्ती आहे आणि हीच शक्ती नष्ट करण्याचा राहुल गांधींचा हेतू आहे. ही आघाडी केवळ एक सुरुवात आहे आणि महिला सक्षमीकरणाबाबतची जनजागृती मोहीम सुरूच राहील. संसदेत महिलांसाठी 33 टक्के आरक्षण सुनिश्चित होईपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले की, 2023 च्या घटनादुरुस्तीनुसार जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना झाल्यानंतरच आरक्षणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. कोविड-19 महामारीमुळे जनगणनेला विलंब झाला, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रियेवर परिणाम झाला. तर सध्याच्या परिस्थितीत ही प्रक्रिया 2028 पर्यंत पूर्ण होऊ शकते आणि 2032 पर्यंत त्याची पूर्ण अंमलबजावणी होण्याती शक्यता आहे, असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं.












