Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Ujani Dam Project : उजनीत AI डेटा सेंटर आणि फ्लोटिंग सोलर; ३० हजार मच्छीमार चिंतेत, नेमका वाद काय?
महाराष्ट्र

Ujani Dam Project : उजनीत AI डेटा सेंटर आणि फ्लोटिंग सोलर; ३० हजार मच्छीमार चिंतेत, नेमका वाद काय?

Ujani Dam Project
15
  • उजनीतील AI डेटा सेंटर आणि फ्लोटिंग सोलर प्रकल्पांमुळे मच्छीमार चिंतेत.
  • मासेमारी, जलक्षेत्र आणि रोजगारावर परिणाम होण्याची भीती.
  • ३० हजार मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर.
Ujani Dam Project :  सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण परिसरात प्रस्तावित AI डेटा सेंटर, फ्लोटिंग सोलर आणि बॅटरी स्टोरेज प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी आणि मच्छीमारांमध्ये चिंता वाढली आहे.

धरणातील पाण्याचा वापर, मासेमारीची क्षेत्रे, जलचरांचे अस्तित्व आणि हजारो कुटुंबांच्या रोजगारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आंदोलनानंतर ग्रीन हायड्रोजन आणि स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर हे दोन घटक प्रकल्पातून वगळण्यात आले आहे.

उजनी धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीचा प्रस्ताव असलेल्या AI डेटा सेंटर आणि फ्लोटिंग सोलर प्रकल्पावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जेच्या नावाखाली हे प्रकल्प उभारण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे स्थानिक मच्छीमार आणि शेतकरी मात्र चिंतेत आहेत. उजनी जलाशयावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न या प्रकल्पांमुळे निर्माण होऊ शकतो, अशी भीती मच्छीमार संघटनांनी व्यक्त केली आहे. (Ujani Dam Project)

नेमका काय आहे उजनी प्रकल्प?

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उजनी धरण परिसरात २,००० मेगावॅट क्षमतेचा फ्लोटिंग सोलर प्रकल्प, १,८०० मेगावॅट बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम आणि १.४ गिगावॅट क्षमतेचे AI आधारित डेटा सेंटर प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने १६ एप्रिल २०२६ रोजी सामंजस्य करार केला होता. (Battery Energy Storage)

प्रस्तावित फ्लोटिंग सोलर प्रकल्पासाठी उजनी जलाशयाच्या एकूण ३३,६३० हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ३,००० हेक्टर क्षेत्र वापरण्याचे नियोजन आहे. म्हणजेच जलाशयाच्या जवळपास ९ टक्के क्षेत्रावर सौर पॅनेल बसवण्याचा प्रस्ताव आहे. उर्वरित ९१ टक्के क्षेत्र खुले राहील, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. (Floating Solar Project)

हेही वाचा : Ujani Dam Project : उजनीच्या AI डेटा सेंटरवर पवार कुटुंबात वेगवेगळ्या भूमिका? रोहित पवारांचा विरोध, शरद पवार म्हणाले…

मच्छीमारांची चिंता नेमकी काय?

उजनी धरणावर मासेमारी आणि त्यासंबंधित व्यवसायातून पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील ३० हजारांहून अधिक लोक अवलंबून असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीने केला आहे. फ्लोटिंग सोलर पॅनेलमुळे मासेमारीची ठिकाणे, माशांच्या प्रजननाची क्षेत्रे आणि मासेमारीचे पारंपरिक मार्ग मर्यादित होण्याची भीती मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. (Ujani Fishermen Protest)

जलाशयातील पाण्याचे तापमान, जलचरांचे अधिवास आणि स्थलांतरित पक्ष्यांवरही परिणाम होऊ शकतो, अशी चिंता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रकल्प राबवण्यापूर्वी मच्छीमारांना विश्वासात घ्यावे आणि त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.

पाण्याच्या वापरावरून दावे-प्रतिदावे

AI डेटा सेंटरसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासेल, असा दावा आंदोलकांकडून करण्यात आला आहे. आमदार रोहित पवार यांनी या प्रकल्पासाठी ९ टीएमसी पाण्याची आवश्यकता भासू शकते, अशी चिंता व्यक्त केली होती. (Solapur AI Data Center)

मात्र, सोलापूर जिल्हा प्रशासनाने हा दावा फेटाळला आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, डेटा सेंटरमध्ये क्लोज्ड-लूप डायरेक्ट-टू-चिप कूलिंग तंत्रज्ञान वापरण्यात येणार असून, वार्षिक पाण्याचा वापर सुमारे ०.४२ ते ०.५३ टीएमसीपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या सध्याच्या वाटपावर परिणाम होणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आंदोलनानंतर प्रकल्पात बदल; मच्छीमारांचा विरोध कायम

उजनी परिसरातील प्रस्तावित प्रकल्पांना शेतकरी आणि मच्छीमारांनी विरोध दर्शवत आंदोलन केले. ३१ ऑक्टोबर रोजी पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. या आंदोलनात आमदार रोहित पवार, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह स्थानिक शेतकरी आणि मच्छीमार सहभागी झाले होते.

या विरोधानंतर प्रकल्पाच्या मूळ आराखड्यातील ग्रीन हायड्रोजन प्रकल्प आणि स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर (SMR) हे दोन घटक वगळण्यात आल्याचे वृत्त आहे. आता सुधारित सामंजस्य करारात AI डेटा सेंटर, फ्लोटिंग सोलर आणि बॅटरी स्टोरेज या घटकांचा समावेश राहणार आहे. मात्र, फ्लोटिंग सोलर प्रकल्पामुळे मासेमारीच्या व्यवसायावर परिणाम होण्याची भीती मच्छीमारांनी कायम व्यक्त केली आहे.

विकास की पारंपरिक रोजगाराचा प्रश्न?

उजनी धरण परिसरातील प्रस्तावित प्रकल्पांमुळे गुंतवणूक, रोजगार आणि पायाभूत सुविधांना चालना मिळण्याची अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. दुसरीकडे, स्थानिक मच्छीमार आणि शेतकरी पाणी, पर्यावरण आणि पारंपरिक रोजगाराच्या संरक्षणाची मागणी करत आहेत.

त्यामुळे उजनीतील प्रकल्पांबाबत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन निर्णय होणार का, सार्वजनिक सुनावणीत त्यांच्या शंकांचे निरसन होणार का आणि मासेमारीचा व्यवसाय सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाणार, हे प्रश्न आता महत्त्वाचे ठरणार आहेत.

हेही वाचा :  Ujjani Dam Water Storage : उजनी धरणात पाणी असूनही जलसाठ्यावर ताण! बॅकवॉटरमधील उपसा, विसर्ग अन् सिंचनाचे नेमकं गणित काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts