Sonam Wangchuk : आज सकाळी थेट रुग्णालयातून सोनम वांगचुक यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटले आहे. चला तर पाहुयात.
दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान काल १८ जुलै रोजी सकाळी पोलिसांनी जोरजबरदस्तीने उचलून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी हलविण्यात असलेले पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी प्रथमच फेसबुक पोस्ट केला आहे. या संदेशात त्यांनी आपण रुग्णालयात नसून सफदरजंग येथे पोलिसांच्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे. तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने ‘चलो संसद’ मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
हेही वाचा: अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकला; डोनाल्ड ट्रम्प यांचे नवे लष्करी आदेश, मध्यपूर्वेत तणाव शिगेला
सध्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत?
सध्या सोनम वांगचुक यांच्यावर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यांच्या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आंदोलनाला नवे वळण मिळाले असून, कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दीपके यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. याशिवाय, २० जुलै रोजी संसदेकडे मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली असून, या आंदोलनात विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन वांगचुक यांनी आपल्या संदेशातून केले आहे.
आपल्या संदेशात वांगचुक यांनी सध्याच्या आंदोलनाला “भारताची दुसरी स्वातंत्र्य चळवळ” असे संबोधले आहे. अन्याय, भीती आणि पेपर लीकसारख्या घटनांपासून देशाला मुक्त करण्यासाठी नागरिकांनी एकत्र येण्याची वेळ आल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, स्वतःला कथितपणे बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवण्यात आल्याचा उल्लेख करत संसद मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले. हा संदेश गीतांजली यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
डॉक्टरांनी नेमकं काय सांगितले?
दरम्यान, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दीर्घकाळ सुरू असलेल्या उपोषणाचा परिणाम सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीवर झाला आहे. उपोषणामुळे त्यांचे सुमारे ९.५ किलो वजन घटले असून, शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.









