Sonam Wangchuk: २६ दिवसांच्या संघर्षानंतर सोनम वांगचूक यांनी अखेर उपोषण मागे घेतले. केंद्राच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडले.
NEET पेपरफुटी प्रकरणात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Education minister Dharmendra pradhan) यांच्या राजीमान्यासाठी भारताची राजधानी दिल्लीतील जंतर- मंतर येथे लडाखचे पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांचे २६ दिवसांपासून सुरु असलेले उपोषण अखेर मागे घेतले. गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात मध्यरात्री केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडले.
या भेटीदरम्यान केंद्र सरकारच्या प्रतिनिधींशी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर वांगचुक यांनी संवादांच्या माध्यमातून पुढील मार्ग काढण्याचा निर्णय घेत उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट
उपोषण मागे घेतल्यानंतर सोनम वांगचूक (Sonam Wangchuk) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले की, “केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, डॉ. जितेंद्र सिंह तसेच लडाखमधील विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मी 26 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण समाप्त केले आहे.”
काही महत्त्वाच्या अटी
त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या काही दिवसांत विविध राजकीय पक्षांतील अनेक खासदारांनी त्यांची भेट घेऊन तसेच पत्राद्वारे उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. सखोल चर्चा, काही महत्त्वाच्या अटी आणि शांततापूर्ण तोडगा निघावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वांगचूक (Sonam Wangchuk) यांनी लवकरच संपूर्ण भूमिका आणि चर्चेतील मुद्द्यांवर सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ प्रसिद्ध करणार असल्याचेही सांगितले. तसेच त्यांनी समर्थकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारापासून दूर राहण्याचे आवाहन केले.
दरम्यान, त्यांच्या उपोषणाच्या समाप्तीनंतर पुढील चर्चांकडे आणि केंद्र सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









