Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे, सातारा आणि सोलापूरच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ब्रिटिशकालीन भाटघर धरण १००% भरले…
Top News

पुणे, सातारा आणि सोलापूरच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ब्रिटिशकालीन भाटघर धरण १००% भरले…

Bhatghar Dam

Bhatghar Dam: पुणे, सातारा आणि सोलापूरच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ब्रिटिशकालीन भाटघर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, नीरा नदीत २,६१५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील (Pune) भोर तालुक्यात असलेले ऐतिहासिक ब्रिटिशकालीन भाटघर धरण (येसाजी कंक जलाशय) अखेर १०० टक्के भरले आहे. गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आणि रविवारी दुपारी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याची नोंद झाली.

धरण भरल्यानंतर स्वयंचलित दरवाजे टप्प्याटप्प्याने उघडण्यात आले आहेत. सध्या वीज निर्मिती केंद्रातून १,६१५ क्युसेक आणि धरणाच्या स्वयंचलित दरवाजांमधून १,००० क्युसेक, असा एकूण २,६१५ क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार या विसर्गात आवश्यकतेनुसार वाढ किंवा घट केली जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: जालना गोवंश कत्तल प्रकरण: गोरक्षकांवर हल्ला, मटन मार्केटवर कारवाई

दरम्यान, ३० जुलै रोजीच नीरा देवघर धरणही पूर्ण क्षमतेने भरले असून तेथूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नीरा नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

सहाय्यक अभियंता गणेश टेंगळे यांनी सांगितले की, यंदा मान्सून उशिरा सक्रिय झाला असला तरी धरणाच्या पश्चिम भागात झालेल्या दमदार पावसामुळे जलसाठा वेगाने वाढला. परिणामी, गेल्या वर्षाच्या तुलनेत भाटघर धरण यंदा सुमारे १५ दिवस आधीच पूर्ण भरले आहे.

प्रशासनाने नागरिकांना नीरा नदीपात्रात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठावरील विकासकामे तात्पुरती थांबवून बांधकाम साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे. तसेच शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जाणारे पंप सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सखल भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन तहसील प्रशासन आणि पाटबंधारे विभागाने केले आहे.

भाटघर धरणाची एकूण साठवण क्षमता २३.७५ टीएमसी असून या पाण्याचा लाभ पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील एकूण नऊ तालुक्यांतील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी होतो. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पूर्व भागातील तसेच दुष्काळग्रस्त क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून वर्षभराच्या पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे.

FAQs

1. भाटघर धरण किती टक्के भरले आहे?
उत्तर: भाटघर धरण 100 टक्के भरले असून ते पूर्ण क्षमतेने जलसाठा साठवून आहे.

2. सध्या नीरा नदीत किती पाण्याचा विसर्ग सुरू आहे?
उत्तर: वीज निर्मिती केंद्रातून 1,615 क्युसेक आणि स्वयंचलित दरवाजांमधून 1,000 क्युसेक, असा एकूण 2,615 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

3. भाटघर धरण भरल्याचा सर्वाधिक फायदा कोणत्या जिल्ह्यांना होणार आहे?
उत्तर: पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजांना याचा मोठा फायदा होणार आहे.

4. प्रशासनाने नागरिकांना कोणता इशारा दिला आहे?
उत्तर: नीरा नदीपात्रात जाणे टाळावे, नदीकाठावरील विकासकामे तात्पुरती थांबवावीत, पंप व बांधकाम साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts