NEET paper Leak Motegaonkar Arrested: नीट पेपरफुटी प्रकरणात तपास यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असून अनेकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आता या प्रकरणात आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. प्रा. माटेगावकर यांना अटक करण्यात आली असून, या संपूर्ण प्रकरणामागचं नेमकं सत्य काय, जाणून घ्या.
नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे लातूर आणि पुणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने सुरू असून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लातूरमध्ये तळ ठोकला आहे. पुण्यातही अनेक संशयितांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आरसीसी पॅटर्नचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना अटक करण्यात आली असून, गेस पेपरमधील ४२ प्रश्न प्रत्यक्ष नीट परीक्षेत कसे जुळले याचा तपास यंत्रणा सखोल तपास करत आहे.
लातूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सीबीआयच्या पथकाकडून विविध ठिकाणी तपास मोहीम राबवली जात आहे. आरोपींशी संबंधित कागदपत्रे. मोबाईल डेटा आणि आर्थिक व्यवहारांशी चौकशी सुरू आहे. पुणे, नांदेड आणि नाशिक या शहरांमधूनही तपासासाठी महत्वाचे धागेदोरे मिळाल्याचे सांगितले जात आहे.
प्रा. शिवराज माटेगावकर रात्रभर चौकशी
प्रा. शिवराज माटेगावकर यांची पुण्यातील सीबीआय कार्यालयात रात्रभर चौकशी करण्यात आली. त्यानंतर सकाळी पुन्हा त्यांना चौकशीसाठी बसवण्यात आले. लातूरमधील आरसीसी क्लासेसमध्येही तपास अधिकाऱ्यांनी काही कर्मचाऱ्यांची आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली. अखेर सीबीआयने माटेगावकर यांना अटक केली असून त्यांच्या लातूर येथील निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, खासगी कोचिंग क्लासेसचा या प्रकरणाशी संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे. सीबीआयच्या पथकाने लातूरमधील क्लासेस परिसरात भेट देऊन माहिती गोळा केली. गेस पेपरमधील 42 प्रश्न नीट परीक्षेत तंतोतंत आल्याच्या आरोपांनंतर तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.
सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी हजर
तपासादरम्यान पी. व्ही. कुलकर्णी आणि काही खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांमध्ये संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संबंधित क्लासेस चालकांना नोटीस बजावून पुण्यातील सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या जीवशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे यांनाही दिल्लीतील विशेष न्यायालयाने 14 दिवसांच्या पोलीस कोठडीचा आदेश दिला आहे. तपासासाठी त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
विद्यार्थी संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली
नीट पेपरफुटीच्या आरोपांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि विविध विद्यार्थी संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पुण्यात एनएसयूआयकडून आंदोलनाची घोषणा करण्यात आली असून, मॉडर्न महाविद्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मनीषा मांढरे या याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या अटकेनंतर विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.












