Abhijit Dipke News: दिल्लीत आंदोलनासाठी गेलेल्या अभिजित दिपके यांना विमानतळावरच पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. याचदरम्यान, हिंगोलीतील त्यांच्या मूळ गावी दीर्घ आजाराने आजींचे निधन झाले. या दुहेरी संकटामुळे दिपके कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
राजकीय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आलेले कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दिपके (Abhijit Dipke Family) यांच्यासाठी दुःखद बातमी समोर आली आहे. दिल्लीत आंदोलनासाठी गेलेल्या दिपके यांना विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त असतानाच, त्यांच्या आजींचे हिंगोली जिल्ह्यातील मूळ गावी निधन (Abhijit Dipke Grandmother Death) झाले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा: शिक्रापूरमध्ये चोरट्यांचा हैदोस! एकाच रात्री १३ दुकाने फोडली; सीसीटीव्हीत शस्त्रधारी चोरटे कैद
हिंगोलीतील मूळ गावी घेतला अखेरचा श्वास
अभिजित दिपके (CJP Latest News) यांच्या आजींचे संतुक पिंपरी येथे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. वयोमानामुळेही त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आणि कुटुंबीयांवर दुःखाचा प्रसंग ओढवला.
आजी या अभिजित यांच्या वडिलांच्या आई होत्या. त्यांच्या निधनाने दिपके कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
आई-वडील छत्रपती संभाजीनगरमध्ये
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित यांचे वडील भगवान दिपके आणि आई अनिता हे छत्रपती संभाजीनगर येथे आहेत. आजींच्या निधनानंतर ते मूळ गावी जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
दुसरीकडे, अभिजित दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे त्यांना आजींच्या निधनाची बातमी समजली आहे का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही.
आंदोलनासाठी दिल्ली गाठली; विमानतळावर कारवाई
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करण्याच्या उद्देशाने अभिजित दिपके मुंबईहून दिल्लीला गेले होते. मात्र, विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आले.
या कारवाईनंतर त्यांना कोणत्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया काय आहे, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
कुटुंबीयांशी संपर्काबाबत उत्सुकता
आंदोलनाच्या निमित्ताने अभिजित गेल्या काही दिवसांपासून घरापासून दूर होते. कुटुंबीयांशी त्यांचा फोनवरून संपर्क असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आजींच्या निधनापूर्वी त्यांची भेट झाली होती की नाही, याची खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही.
एकीकडे दिल्लीतील पोलिसांच्या कारवाईची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनाची दुःखद घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर अभिजित यांना कुटुंबीयांशी संपर्क साधता येणार का, याकडे लक्ष लागले आहे.









