August 2026: ऑगस्ट महिन्यात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचा दुर्मीळ योग जुळून येणार आहे. मात्र ही दोन्ही ग्रहणे भारतातून दिसणार नसल्याने सूतकाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
ऑगस्ट २०२६ मध्ये श्रावण महिन्यात (Sharavan Month) दोन महत्वाच्या खगोलीय घटना घडणार आहेत. या महिन्यात १२ ऑगस्ट रोजी हरियाली अमावास्येच्या दिवशी वर्षातील दुसरे पूर्ण सूर्यग्रहण होणार असून, त्यानंतर २८ ऑगस्टला रक्षाबंधन (Raksha bandhan) आणि श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्रग्रहण लागणार आहे. मात्र ही दोन्ही ग्रहणे भारतात दिसणार नसल्यामुळे देशात सुतक काल पाळण्याची आवश्यकता नसणार आहे.
१२ ऑगस्टला पूर्ण सूर्यग्रहण
ज्योतिषतज्ज्ञ यांच्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट २०२६ रोजी होणारे सूर्यग्रहण हे खग्रास स्वरूपाचे असेल. हे ग्रहण आर्क्टिक प्रदेश, ग्रीनलँड, आइसलँड, स्पेन, रशिया आणि पोर्तुगालच्या काही भागांत स्प्ष्टपणे दिसणार आहे. तसेच उत्तर अमेरिका, युरोप आणि पश्चिम आफ्रिकेतील काही भागांत ते अंशतः पाहता येईल. भारतात मात्र हे ग्रहण दिसणार नसल्याने धार्मिक दृष्टिकोनातून त्याचा परिणाम मानला जाणार नाही.
रक्षाबंधनाला पूर्ण चंद्रग्रहण
२८ ऑगस्ट २०२६ रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी वर्षातील दुसरे पूर्ण चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण उत्तर व दक्षिण अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेच्या काही प्रदेशांत दिसेल. भारतात त्याची दृश्यता नसल्यामुळे येथेही सुतक काळ लागू होणार नाही.
भारतात सुतक का लागू होणार नाही?
धर्मशास्त्रानुसार ग्रहण ज्या ठिकाणी प्रत्यक्ष दिसते, तेथेच त्याचा सुतक काळ ग्राह्य धरला जातो. त्यामुळे भारतात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण दोन्ही अदृश्य असल्याने मंदिरांतील पूजा, धार्मिक विधी किंवा सणांच्या कार्यक्रमांवर कोणतेही बंधन राहणार नाही.
भाविक हरियाली अमावस्येला स्नान, दान, पितृतर्पण, शिवपूजन आणि रुद्राभिषेक नेहमीप्रमाणे करू शकतील. तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधणे, श्रावणी उपाकर्म, यज्ञोपवीत संस्कार आणि पौर्णिमेची पूजा यामध्येही कोणताही अडथळा येणार नाही.
एका पंधरवड्यात दोन ग्रहणे विशेष का?
खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून एका पक्षात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होणे हा दुर्मिळ योग मानला जातो. अशी घटना वारंवार घडत नाही. मात्र यंदा ही दोन्ही ग्रहणे भारतात न दिसल्याने देशातील धार्मिक परंपरांवर त्याचा थेट परिणाम होणार नाही.
ज्योतिषीय मान्यतांनुसार संभाव्य परिणाम
पारंपरिक श्रद्धेनुसार ग्रहणानंतर काही काळ जागतिक स्तरावर सामाजिक, राजकीय आणि आर्थिक बदल दिसून येऊ शकतात. काही तज्ज्ञ व्यापार, संशोधन, तंत्रज्ञान आणि बौद्धिक क्षेत्रात प्रगतीचे संकेतही व्यक्त करतात. मात्र या सर्व गोष्टी ज्योतिषीय श्रद्धांवर आधारित आहेत.
ग्रहणकाळात काय करावे?
भारतात सूतक लागू नसल्याने नेहमीप्रमाणे पूजा-अर्चा करता येईल. श्रद्धेनुसार भगवान शिव, देवी दुर्गा आणि श्रीहनुमान यांची उपासना करणे शुभ मानले जाते. तसेच महामृत्युंजय मंत्र, दुर्गासप्तशती आणि हनुमान चालीसाचे पठण केल्यास मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे.









