Breaking News :
  • Home
  • आरोग्य
  • सिप्लाला मोठा धक्का! पुणे युनिटचा औषध विक्री परवाना रद्द; FDAच्या तपासणीत गंभीर त्रुटी उघड
Pune

सिप्लाला मोठा धक्का! पुणे युनिटचा औषध विक्री परवाना रद्द; FDAच्या तपासणीत गंभीर त्रुटी उघड

Cipla Pune Unit
3
Cipla Pune Unit: सिप्लाशी संबंधित पुण्यातील युनिटवर महाराष्ट्र FDAने मोठी कारवाई केली आहे. औषधांची साठवणूक, स्टॉक नोंदी आणि रिकॉल प्रक्रियेत अनियमितता आढळल्यानंतर युनिटचा औषध विक्री परवाना रद्द करण्यात आला आहे. नेमक्या कोणत्या त्रुटी आढळल्या आणि सिप्लाने यावर काय भूमिका मांडली? जाणून घ्या.

औषध क्षेत्रातील आघाडीची कंपनी सिप्लाशी संबंधित पुण्यातील C&F युनिटविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर पाऊल उचलले आहे. औषधांचा मोठा साठा, नोटबूक आणि बाजारातून औषधे परत मागवण्याच्या प्रक्रियेत नियमांचे पालन न केल्याचे आढळल्यानंतर Cipla Pharma & Life Sciences Ltd पुण्याच्या या युनिटचा औषध विक्री परवाना आता रद्द करण्यात आला आहे.

हेही वाचा: यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी ४ की ५ सप्टेंबरला? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व

FDAच्या कारवाईमध्ये Reactin Plus Tablets हे औषध केंद्रस्थानी आहे. या औषधाच्या पॅकेजिंगपासून ते त्याच्या साठवणूक आणि रिकॉल प्रक्रियेपर्यंत विविध बाबींची तपासणी करण्यात आली. FDAच्या माहितीनुसार, परवाना रद्द करण्याचा आदेश गुरुवारपासून प्रभावी झाला आहे.

Reactin Plus च्या लेबलिंगवर FDAचा आक्षेप

जूनमध्ये FDAच्या पथकाने पुण्यातील (Cipla Pune Unit) संबंधित युनिटची तपासणी केली होती. त्यावेळी Reactin Plus Tabletsच्या पॅकेजिंगवर परवानगी नसलेला दावा छापण्यात आल्याचे समोर आले.

हे प्रिस्क्रिप्शनवर दिले जाणारे औषध असून, त्याच्या पॅकेजिंगवर ‘analgesic and antipyretic’ असा उल्लेख करण्यात आला होता. म्हणजेच हे औषध वेदना कमी करणारे आणि ताप उतरण्यासाठी वापरले जाते, असा दावा करण्यात आला होता.

FDAने या पॅकेजिंगला नियमबाह्य ठरवत कारवाई केली. तपासणीदरम्यान सुमारे 11.19 लाख रुपये किमतीचा औषधसाठा ताब्यात घेण्यात आला. तसेच संबंधित औषधांचा बाजारातून रिकॉल करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, कंपनीकडून या आदेशाची पूर्ण अंमलबजावणी झाली नसल्याचे प्रशासनाच्या तपासणीत आढळले.

स्टोरेज पद्धतीवरही प्रश्नचिन्ह

पुढील तपासणीत औषध साठवण्याच्या पद्धतीतही त्रुटी असल्याचे समोर आले. युनिटमध्ये काही औषधे थेट जमिनीवर ठेवण्यात आल्याचे FDAच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

मुदत संपलेल्या औषधांची हाताळणी, त्यांची स्वतंत्र नोंद आणि विल्हेवाट यासाठी असलेल्या प्रक्रियेतही आवश्यक ती काटेकोरता नसल्याचे तपासणीत आढळले.

प्रत्यक्ष साठा आणि डिजिटल नोंदीत फरक

FDAच्या तपासणीत युनिटमधील प्रत्यक्ष औषधसाठा आणि संगणक प्रणालीतील स्टॉक रेकॉर्डमध्ये तफावत असल्याचे आढळले. औषधांच्या खरेदी-विक्रीशी संबंधित नोंदी आणि प्रत्यक्ष उपलब्ध साठा यांच्यातही विसंगती आढळल्याचे प्रशासनाने सांगितले.

याशिवाय औषधे व्यवस्थित ठेवण्यासाठी आवश्यक पॅलेट आणि रॅकची व्यवस्था अपुरी असल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले. रिकॉल केलेल्या औषधांबाबतच्या नोंदी आणि कार्यपद्धतीतही नियमांचे पालन न झाल्याचे FDAने नमूद केले आहे.

सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत तडजोड नाही

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी औषधांचे उत्पादन, साठवणूक आणि वितरणाशी संबंधित नियम मोडणाऱ्या संस्थांविरोधात कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

औषधांच्या गुणवत्तेशी आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित प्रकरणांमध्ये प्रशासन कोणतीही हलगर्जीपणा सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

सिप्लाची कारवाईविरोधात न्यायालयीन लढाई

FDAच्या आदेशानंतर सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेसने या निर्णयाला आव्हान दिले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण सध्या न्यायालयाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना यावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही.

कंपनीने मात्र आपल्या भूमिकेत एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली आहे. FDAच्या आदेशामध्ये सिप्लाच्या उत्पादनांच्या सुरक्षितता, गुणवत्ता किंवा परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित केलेला नाही, असे कंपनीने म्हटले आहे.

तसेच या आदेशाचा अर्थ उत्पादनांमुळे रुग्णांच्या सुरक्षिततेशी संबंधित समस्या निर्माण झाल्या आहेत, असा नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. आता FDAची कारवाई आणि कंपनीने घेतलेला कायदेशीर मार्ग यामुळे या प्रकरणाचा पुढील निकाल काय लागतो, याकडे लक्ष लागले आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts